Shri Tuljabhavani Temple Trusts,
Shri Tuljabhavani Sainiki Sec. & Higher Sec. School,Tuljapur

आधुनिक काळातील शिक्षक व शिक्षकां समोरील आव्हाने!

शिक्षक दिन विशेष
—————————————

आधुनिक काळातील शिक्षक व शिक्षकां समोरील आव्हाने!
—————————————

 

शिक्षक हे समाज घडविणारे कलावंत असतात. ज्याप्रमाणे मूर्तिकार मूर्तीला आकार देतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना आकार देण्याचे मौलिक काम करतात. सुसंस्कारित करून ज्ञान, कला, कौशल्य, संस्कार शिकवतात. ही माझी शाळा आहे, मी एक शिक्षक आहे, विद्यार्थी माझे दैवत आहेत व विद्यार्थ्यांना घडविणे हाच माझा स्वधर्म आहे. असे मानून शिक्षक रात्रंदिवस विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करतात. विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकांना सुद्धा काही अडचणींना सामोरे जावे लागते. काही समस्या काही प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. आधुनिक परिवर्तनशील शैक्षणिक प्रवाहातील काही आव्हाने त्यांच्यासमोर उभे राहतात. त्यांना सोडवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत असतात. आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याबद्दल त्यांच्या कर्तव्याबद्दल थोडक्यात घेतलेला आढावा.

 मित्रांनो, आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या भारताचे पूर्व राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राहिलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन! एक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, राजकीय विचारवंत, आर्थिक तत्त्ववेत्ता, समाज सुधारक व देशाला लाभलेले पूर्व राष्ट्रपती म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्यांचा जन्मदिवस!! देशाला भक्कम मजबूत व नवयुवक, तरुण पिढीचा भक्कम पाया निर्माण करावयाच्या असेल तर तो शिक्षकच करू शकतो!! मुलांचे पहिले गुरू आई वडील असतात तर आई वडीला नंतर शिक्षकच मुलाचे भविष्य घडवत असतात! विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत, घडवत ते राष्ट्राचे भविष्य घडवत असतात! राष्ट्रा चीउभारणी करीत असतात. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, माझा जन्मदिवस फक्त जन्मदिवस म्हणून साजरा न करता, “शिक्षक दिन” म्हणून साजरा करावा त्यातच मला खूप आनंद आहे व माझा व माझ्या गुरुजनांचा सन्मान आहे! अशा महान तत्ववेत्याला आजच्या दिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन!! व आपणा सर्व प्रिय वाचकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! शिक्षक सर्वप्रथम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून, विद्यार्थ्यांवर छाप पाडत असतात. विद्यार्थ्यांना आपलंसं करून घेतात. आठवा लहानपणीचे ते दिवस. आजही आपल्याला आपल्या लहानपणीचे शिक्षक आठवतात. आपण नेहमी त्यांचे स्मरण करतो हे शिक्षक असे होते, ते शिक्षक तसे होते, त्यांनी आम्हाला संस्काराची शिदोरी दिली, ते आम्हाला अशा पद्धतीने शिकवत होते. त्यांनी शिकवलेलं मला आजही आठवतं, त्यांनी शिकवलेली कविता आजही माझ्या घरात मन करून आहे! कारण त्यांनी आपल्या मनात घर करून शिकवलेलं असतं. मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचेल, त्यांना समजेल व रुचेल, त्यांच्याच भाषेत अर्थबोध होईल व त्याला समजल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे व उत्साहाचे भाव पाहून शिक्षकाचे मन किती आनंदित होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. आपल्यासमोर वर्गात बसलेली ही चिमुकली मुले निरागस चेहऱ्याची, भोळी भाबडी, आपल्यावर जीवापाड प्रेम कर्णा री, जिवापाड विश्वास ठेवणारी, असतात. त्यांच्या विचारानुसार शिक्षक हेच गुरु असतात. मार्गदर्शक असतात. पालक असतात. चांगल्या गोष्टी शिकवणारे असतात. म्हणून शिक्षकाला नेहमी अलर्ट, दक्ष, कर्तव्यदक्ष, राहिले पाहिजे. कारण शिक्षक हे मुलांच्या जीवनाचा पाया घडवत असतात. पाया हा भक्कम व योग्य दिशादर्शक असला पाहिजे. तरच ही मुले शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गावर पुढे चालत राहतात. पण आज काळ बदलला, काळाचे परिवर्तन झाले, तसे विज्ञानाने प्रगती केली. विज्ञान व तंत्रज्ञान यात खूप मोठी प्रगती झाली. भारताने चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवले इतकेच नव्हे तर चांद्रयान – 3 अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागले. तसे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे केंद्रित झाले. भारत हा जगातील शक्तिशाली देश बनला. तसेच शिक्षणात ही आमुलाग्र बदल झाले. शिक्षणाच्या पद्धती, अध्यापनाच्या पद्धती, परीक्षेच्या पद्धती, यामध्ये अमुलाग्र बदल झाला. ऑनलाइन शिक्षण हे सुरू झाले.

पुस्तकांचे ओझे कमी झाले. दप्तरांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला. ही एक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली व हितकारक बाब आहे. तेव्हा अशा तंत्रज्ञानात झालेल्या बदलाला स्वीकारणे हे आधुनिक शिक्षकांचे कर्तव्य आहे. शिक्षकांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. तरच शिक्षक आजच्या या नवीन पिढीसमोर उभारू शकतात!! नवीन पिढी नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन संकल्पना, नवीन उपक्रम, नवीन प्रयोग, कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, नवीन तंत्रज्ञान याची माहिती व अध्ययन शिक्षकांनी करणे खूप गरजेचे आहे.
शिक्षकांनी स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोर बसलेला विद्यार्थी आपल्या सर्वांगाचे निरीक्षण करतो, सरांचे राहणीमान कसे आहे, सर कोणत्या पद्धतीचे कपडे घालतात,, सरांची भाषा कशी आहे, कशा पद्धतीने बोलतात, सरांचा स्वभाव कसा आहे, सरांना कोणकोणत्या गोष्टी आवडतात, सरांचा अभ्यास कुठपर्यंत आहे, असे बारीक निरीक्षण मुलांचे असते. या निरीक्षणावरूनच मुले आपल्या शिक्षकांचा सहवास ठेवतात. शिकवताना सर कोणकोणती उदाहरणे देतात, कोण कोणते संदर्भ सांगतात, सरांचा स्वभाव कुण्या प्रकारचा आहे, सरळ स्वभाव, रागीट स्वभाव, मध्यम स्वभाव, प्रेमळ स्वभाव, स्थिर स्वभाव, हट्टी व जिद्दी स्वभाव, अहंकार युक्त भाषा या सगळ्या उदाहरणावरून विद्यार्थी आपली ओळख ठरवत असतात!! म्हणून लहान मुलावर संस्कार करत असताना त्यांना घडवत असताना स्वतः संस्कार रुपी ज्ञानाने घडले पाहिजे तरच आपण समोर बसलेल्या मुलांचे समाधान करू शकतो. त्यांच्या समस्या सोडवू शकतो, त्यांच्या शंकेचे समाधान करू शकतो. त्यांच्या समस्यावर उपाय सांगू शकतो. प्रभावी अध्यापन करू शकतो. त्यांच्या मनापर्यंत पोहोचेल असे अध्यापन करू शकतो. अध्ययन व अध्यापन ही प्रक्रिया दोन महत्त्वाच्या घटकावर अवलंबून असते. विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील अंतरक्रिया कशा प्रकारची आहे. दोघांमधील सुसंवाद विचारांची देवाणघेवाण कशा पद्धतीची आहे. यावरून विद्यार्थ्यांची ज्ञान प्राप्ती ठरते. शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम करून चालत नाही. शिकवण्याबरोबरच त्याला बरेच अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्या कामाचे वर्णन करणे इथे योग्य नाही पण शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना समजणे यासारखि दुसरीआनंदाची बाब नाही. यासाठी शिक्षकांनी आधुनिक काळात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून त्यावरील उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना पेलण्यासाठी शिक्षकाने स्वतः आत्मनिर्भर होणे खूप महत्त्वाचे आहे. वर्षानुवर्षे शिक्षकांच्या जागेची भरती झालेले नाही हे आपण पाहतच आलेलो आहोत. भरमसाठ लोकसंख्या वाढीमुळे या समस्या अशाच पुढे चालू राहणार आहेत! ही फार मोठी समस्या आधुनिक शिक्षकांच्या समोर आहे त्यासाठी सर्व गुणसंपन्न होणे व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणे हे शिक्षकांसाठी देखील काळाची गरज आहे. अध्यापनाच्या विषयासोबतच इतर विषयांची माहिती, कला गुणविशेष याकडेही लक्ष दिले पाहिजे. पुनश्च एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद! 🙏🏻🙏🏻

—————————————

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल तुळजापूर. जिल्हा धाराशिव.